“कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. त्यासाठी आपण काम करायला हवे आणि त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे“, हा विचार मनी बाळगून नाना पटोले यांनी राजकारणाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. आपलं संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी झोकून दिलं. लहानपणी शेतात व आता त्याच शेतकऱ्यांसाठी ते राजकारणात तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. शिव–शाहू–फुले–आंबेडकर या महामानवांच्या विचारांनी प्रभावित होऊन भंडारा जिल्हा परिषद ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशी नानाभाऊंची यशस्वी घौडदौड सुरूच आहे.
नाना पटोले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
हीच माझी विचारधारा
"आपल्या महाराष्ट्र देशाला महामानवांच्या समृद्ध आणि पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या समतावादी आणि समाजक्रांतीचे विचार कायमच मला आदर्श देणारे आणि प्रेरणादायी वाटतात. याच महामानवांचे आदर्श डोळ्यांमोर ठेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी राजकारण क्षेत्रात उतरलो. 'शिव शाहू फुले आंबेडकर' ही आपल्या महाराष्ट्राची विचारधारा आहे. महाराष्ट्र संतांचा, विचारवंतांचा, क्रांतिकारकांचा आहे. महाराष्ट्र कधीच अन्याय सहन करत नाही. मी आजवर जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून निडरपणे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आलो आहे आणि पुढेही लढत राहीन."
जीवन परिचय
नाना फाल्गुनराव पटोले (नानाभाऊ) यांचा जन्म ५ जून १९६३ रोजी गोंदिया, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचा जन्म मूळच्या शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव फाल्गुनराव पटोले व आईचे नाव मीराबाई पटोले. वडील कृषी अधिकारी व आई गृहिणी होती. त्यात ३ बहिणी, १ भाऊ, आई, वडील, पत्नी आणि ३ मुलांचा समावेश आहे.
शिक्षण
नाना पटोले यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साकोली, गोंदिया व चंद्रपूर येथील जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये झाले. मनोहरभाई पटेल महाविद्यालय (एम. बी. पी. सी), साकोली, महाराष्ट्र येथून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
राजकारणाशी ओळख
लहानपणापासूनच समाजकार्याची अत्यंत ओढ असलेले नानाभाऊ महाविद्यालयातूनच एक नेता म्हणून नावारूपाला येऊ लागले. त्यांच्या वडिलांना ‘खाकी व खादी’ या दोन्ही गोष्टींचा तिटकारा होता. राजकारण आणि पोलिस खाते या दोन्ही क्षेत्रांत भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप आहे, त्यामुळे आपण या सगळ्या पासून लांब राहावं असं वडिलांचं मत होतं. परंतु नाना पटोले वडिलांच्या ह्या मताला छेद देत त्यांच्या राजकारणातील कारकिर्दीचा प्रारंभ झाला. "फक्त दूर बसून चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. आपण स्वतः या क्षेत्रात काम करून हे क्षेत्र सुधारलं पाहिजे. चांगल्या लोकांनी या क्षेत्रात यायला हवं." या विचाराने व लोकांचा पाठिंबा मिळवून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून नानाभाऊंना राजकारणाची व समाजकारणाची खूप आवड. महाविद्यालयाअंतर्गत होणाऱ्या निवडणुकांमध्ये एन. एस. यू. आय. या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केलं. १९९० साली भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. १९९८ - १९९९ मध्ये ते साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले व २००४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेची जागा राखली. २००८ साली काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये ते १६- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन यावरील स्थायी समितीचे देखील सदस्य होते. पुढे भारतीय राजकारणातील ऐतिहासिक क्षण म्हणजे ८ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय जनता पक्षातून राजीनामा दिला व काँग्रेस पक्षात पुनःप्रवेश केला. २०१९ मध्ये ते विधानसभा अध्यक्षपदी नेमले गेले. त्यानंतर २०२१ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
'जनतेचे सरकार' आणण्यासाठी खाली दिलेल्या टॅब वर क्लिक करून आपण आपल्या समस्या मांडू शकता.
समाजकार्य हाच माझा धर्म
सरकारी वनजमीन कायद्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील भूमिहीन शेतमजूर आदिवासींवर मोठ्या संख्येने उपासमारीची पाळी येणार होती. याला वाचा फोडण्यासाठी नानाभाऊंनी ५ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी ‘अतिक्रमण हटाव’ मोर्चा काढला. त्यासाठी त्यांना नागपुर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी उपोषण करण्याची आग्रही भूमिका घेतली आणि आदिवासी शेतमजुरांना हक्काची जमीन मिळवून दिली.
त्यांनी अनेक जातीजमातींचा उद्धार करण्यासाठी, त्यांना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा, शिक्षणाच्या योग्य संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने अनेक विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांचा समावेश ओ.बी.सी. प्रवर्गांमध्ये करून घेण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावं याकरता त्यांच्या गावातील चुलबंद नदीवरील दुर्गाबाई डोह येथील बांधाच्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आणले.
पहिल्यांदा आमदारपदी असताना नाना पटोले यांनी ‘पलास’ या गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची प्रथा सुरु केली. ही प्रथा पुढे १० ते १५ वर्ष नाना पटोले यांनी सातत्याने सुरु ठेवली. या कालावधीत त्यांनी दर वर्षी किमान २५० जोडप्यांचा सामूहिक विवाह करून त्यांचा संसार थाटून दिला.
साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची संकल्पना मांडली आणि केवळ संकल्पनाच नाही, तर या विस्तारित उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यारंभही झाला.
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी १२ धान गोदाम, चुलबंद नदीवरील बंधारे, वाहतुकीसाठी पूल, मोफत अभ्यासिका, एम. पी. एस. सी. मार्गदर्शन केंद्र तसेच छावा संग्राम परिषदेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजनांना चालना दिली.
पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, रोजगार मेळावे, कौशल्य विकास कार्यशाळा असे विविध उपक्रम त्यांनी राबवले व त्याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना झाला.
ओबीसीवरील अन्यायाविरोधात लाखांदूर ते भंडारा लाँगमार्च असो, शेतकऱ्यांसाठी भंडारा ते नागपूर बैलबंडी मोर्चा असो, आदिवासींना शेत जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी मध्यवर्ती कारागृहातील उपोषण असो, अशा प्रत्येक बाबतीत नानाभाऊ पटोले यांनी निःस्वार्थपणे आंदोलने उभारून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.